पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला

पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला

दिल्ली, 31 जुलै 2021 (TNA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.

पंतप्रधानांनी भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधला. अधिकारी प्रशिक्षणार्थींबरोबर हा एक उत्स्फूर्त संवाद होता आणि पंतप्रधानांनी सेवेच्या अधिकृत बाबींच्या पलीकडे जाऊन नवीन पिढीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या आकांक्षा आणि स्वप्नांबाबत चर्चा केली.

हरियाणाचा अनुज पालीवालने आयआयटी रूरकी इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना केरळ केडर मिळाले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी अधिकाऱ्याच्या विरोधाभासी परंतु पूर्णपणे उपयुक्त पर्यायांबद्दल चर्चा केली. गुन्हे अन्वेषणात जैव-तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी आणि नागरी सेवा परीक्षेत समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाची यापुढील कारकीर्दीच्या विविध बाबी हाताळताना मदत होईल असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, पालीवाल यांचा संगीताचा छंद कदाचित पोलिसांच्या रुक्ष जगात दुर्लक्षिला जाईल मात्र तो त्यांना एक उत्तम अधिकारी बनवेल आणि सेवा सुधारण्यात मदत करेल.

रोहन जगदीश हे कायद्यातील पदवीधर असून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा त्यांचा नागरी सेवा परीक्षेचा विषय होता. ते उत्तम जलतरणपटू आहेत. त्यांच्याशी पंतप्रधानांनी पोलिस सेवेतील तंदुरुस्तीच्या महत्त्वावर चर्चा केली. इतक्या वर्षात प्रशिक्षणातील बदलांवरही त्यांनी चर्चा केली कारण जगदीशचे वडील कर्नाटकचे राज्य सेवेतील अधिकारी होते जेथे ते आयपीएस अधिकारी म्हणून जात आहेत.

महाराष्ट्रातील गौरव रामप्रवेश राय हे सिव्हिल इंजिनिअर असून त्यांना छत्तीसगड केडर मिळाले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या बुद्धिबळाच्या छंदाबाबत विचारले आणि रणनीती आखण्यात या खेळाची कशी मदत होईल यावर त्यांनी चर्चा केली. छत्तीसगडमधील नक्षली कारवाया संदर्भात, पंतप्रधान म्हणाले की, या भागात अनन्यसाधारण आव्हाने आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच आदिवासी भागात विकास आणि सामाजिक संपर्क यावर भर देण्याची गरज आहे. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्यासारखे तरुण अधिकारी तेथील तरुणांना हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्यात मोठे योगदान देतील. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही माओवाद्यांचा हिंसाचार रोखत आहोत आणि आदिवासी भागात विकासाचे आणि विश्वासाचे नवीन पूल उभारले जात आहेत.

हरियाणाच्या राजस्थान कॅडरच्या अधिकारी रंजिता शर्मा यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. प्रशिक्षणादरम्यान त्यांना सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीं म्हणून गौरवण्यात आले होते. मास कम्युनिकेशन मधील शिक्षणाचा या कामात होणाऱ्या उपयोगाबद्दल पंतप्रधानांनी चर्चा केली. मुलींची स्थिती सुधारण्यासाठी हरियाणा आणि राजस्थानमध्ये झालेल्या कामाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. त्यांनी रंजिता याना त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी मुलींना दर आठवड्याला एक तास देण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करण्याची सूचना केली.

केरळमधील नितीनराज पी यांना केरळ केडर मिळाले आहे. त्यांना पंतप्रधानांनी फोटोग्राफी आणि शिकवण्याची आवड कायम ठेवण्याचा सल्ला दिला कारण लोकांशी जोडले जाण्याची ती चांगली माध्यमे आहेत.

पंजाबमधील दंतवैद्य डॉक्टर नवज्योत सिमी यांना बिहार कॅडर मिळाले आहे त्यांना पंतप्रधानांनी सांगितले की पोलीस दलात महिला अधिकाऱ्यांचे अस्तित्व या सेवेत सकारात्मक बदल आणेल आणि कोणत्याही भीतीशिवाय करुणा आणि संवेदनशीलतेने कर्तव्य बजावण्याचा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले की, पोलीस सेवेत अधिक महिलांचा समावेश झाल्यास ती अधिक मजबूत होईल.

आंध्र प्रदेशातील कोमी प्रताप शिवकिशोर यांनी आयआयटी खडगपूर येथून एम टेक केले असून त्यांना आंध्र प्रदेश केडरच मिळाले आहे. पंतप्रधानांनी आर्थिक फसवणूक हाताळण्याबाबत त्यांच्या कल्पनांवर चर्चा केली. माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वसमावेशक क्षमतेवर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधानांनी त्यांना सायबर गुन्हे जगातील घडामोडींबाबत अवगत राहण्यास सांगितले. डिजिटल जागरूकता सुधारण्यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन त्यांनी युवा अधिकाऱ्यांना केले.

मोदींनी मालदीवमधील मोहम्मद नझीम या अधिकारी प्रशिक्षणार्थीशीही संवाद साधला. मालदीवच्या निसर्गप्रेमी लोकांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की मालदीव फक्त शेजारी नाही तर एक चांगला मित्र देखील आहे. भारत तेथे पोलीस अकादमी स्थापन करण्यात मदत करत आहे. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांचा उल्लेख केला.

Related Stories

No stories found.
The News Agency
www.thenewsagency.in