Sangli, August 24 (TNA) दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचं निर्मूलन हे केंद्र आणि राज्य शासनाचं ध्येय असून, तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या देशद्रोही प्रवृत्तींचे मनसुबे उधळून लावणं आणि भावी पिढी सुरक्षित ठेवणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं एकजुटीनं नशामुक्तीचा निर्धार करावा, असं आवाहन त्यांनी केलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून नेमिनाथ नगर ते पोलीस मुख्यालय अशी नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या पदयात्रेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नशामुक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवून सुदृढ, सुशिक्षित आणि सक्षम समाज घडवण्याचा संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.
खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि आयुक्त संजीता महापात्र यांच्यासह विविध मान्यवर पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेतली. नशामुक्तीच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांतील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली.
दरम्यान, जिल्हा वार्षिक योजना निधीतून बांधण्यात आलेल्या किल्ला भिंतीचं लोकार्पणही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.