Skip to Content

Maharashtra emerges as the best state in the country under the Pradhan Mantri Micro Food Processing Scheme.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्र ठरले देशात सर्वोत्तम राज्य
25 August 2026 by
thenewsagency


Mumbai, August 25 (TNA) शेतमालाचे मूल्यवर्धन, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ (PMFME) योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने संपूर्ण देशात अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  या सोहळ्यास कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक विनायक कुमार आवटे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल चिद्रावार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

राज्यात २०२१-२२ पासून राबविल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ३१ हजार ७४६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातील १७ हजार ७८६ प्रकल्प महिला उद्योजकांचे असून मंजूर प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग ५६ टक्के आहे. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा वेग मिळाला आहे. 


या योजनेमुळे राज्यात २.६४ लाख प्रत्यक्ष आणि ७.९२ लाख अप्रत्यक्ष, असे एकूण १०.५६ लाख मनुष्यदिन रोजगार निर्माण झाले आहेत. राज्यात सुमारे ३ हजार १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, १८ लाख मेट्रिक टन प्रक्रिया क्षमता तयार झाली आहे. तसेच लाभार्थ्यांना आतापर्यंत ७१५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.  ग्रामीण व शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळवले. राज्य ग्रामीण उपजीविका अभियानासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ श्रीधर दुबे पाटील आणि अश्विनी अकुसकर यांनी तर शहरी उपजीविका अभियानाचा पुरस्कार सहआयुक्त नूतन खाडे आणि प्रसाद राजेभोसले यांनी स्वीकारला.

योजनेच्या उत्कृष्ट जिल्हास्तरीय अंमलबजावणीबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा नोडल अधिकारी दीपक कृष्णा गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा नोडल अधिकारी सुधाकर बाळासाहेब बोराळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर करून आणल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा संसाधन व्यक्ती पवन काबरा यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Share this post
Tags 


Archive